बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने आज बारामतीतील वातावरण ढवळून निघाले. एका महिलेच्या मुलाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत महिलेला बोलावून घेतले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतरही ही महिला जिथे काम करते, तिथे जाऊन धिंगाणा घातला. या नराधमावर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत बारामती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामतीतील सराईत गुन्हेगार रोहित केशव जगताप याने अगोदर मुलाचे अपहरण केले. त्यानंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेला सिकंदर नगर भागातील निर्जनस्थळी असलेल्या झुडपांमध्ये बोलावले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
एवढ्यावरच न थांबता रोहित जगताप याने त्यानंतर ही महिला ज्या ठिकाणी काम करते, त्या कामाच्या स्थळी जाऊन तिथे गोंधळ घातला व त्या ठिकाणी देखील तिला शारीरिक संबंधाची मागणी केली या प्रकरणाने हादरलेल्या महिलेने पोलिस ठाणे गाठले व रोहित जगताप याच्या विरोधात फिर्याद दिली.
या महिलेला कोणी नातेवाईक नाही ही तिची असहाय्यता पाहून रोहित जगताप याने तिच्यावर अत्याचार केले, मात्र या महिलेने पोलिस ठाणे गाठून रोहित जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रोहित केशव जगताप याला लगेच अटक केली.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, फौजदार गणेश पाटील, युवराज घोडके व हवालदार शिंदे व इंगळे यांनी ही कारवाई केली.