पुणे : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी मध्ये राजकीय शक्तिप्रदर्शन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोला मारला यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही लक्ष्य केले.
रोहित पवार यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यावर टिका करत असल्याचे विचारले. तेव्हा रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर यांचे एकूण कर्तृत्व काय हे सांगलीच्या पोलिसांना जाऊन विचारा. पोलीस ठाण्यातल्या त्यांच्यावरच्या केसेस पाहिल्या, तर लक्षात येईल. त्यांचे ठराविक कार्यकर्ते सोडले तर त्यांना कोणी महत्त्व देत नाही.
रोहित पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पडळकर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. ते अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थळी आले, परंतु त्यांचे कार्यकर्ते एकच छंद गोपीचंद अशा प्रकारची घोषणा देत होते. वास्तविक त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषणा द्यायला हव्या होत्या, परंतु राजकारणापलीकडे यांना काही सुचत नाही.
नगर जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी त्यांनी पत्र लिहिले. त्यामध्ये देखील फक्त एका ओळीत नगर जिल्ह्याचे नाव बदलण्यावरचा मजकूर आहे. उर्वरित सर्व मजकूर हा राजकीय स्वरूपाचा आहे. वास्तविक पाहता पडळकर यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आवरायला हवे, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पडळकर जे बोलतात, तेच हवे आहे की काय अशी शंका येते.
खरे तर एखाद्या कुटुंबात जेव्हा लहान मुले मोठ्या व्यक्तीला चुकून बोलतात, तेव्हा आई वडील त्याला समजावतात किंवा शिक्षा करतात. मात्र जेव्हा भाजपचा एखादा नेता विकृतपणे बोलत राहतो, तेव्हा मात्र त्यांचे पक्षाचे मोठे नेते शांत असतात. एका अर्थाने या टीका करणाऱ्या लोकांना मोठे नेते हे पाठराखण करत आहेत.