भंडारा : महान्यूज लाईव्ह
दारुचे व्यसन लागते मग दारु नाही मिळाली माणस अस्वस्थ होतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे. पण एखाद्या प्राण्यालाही दारूचे व्यसन लागू शकते ही खरोखरच नवलाची गोष्ट आहे.
पण भंडारा शहराजवळील पिपरी पुर्नवसनमधील एका कोंबड्याच्या बाबतीत ती खरी ठरली आहे. या कोंबड्याचे मालक भाऊ कातोरे आपल्या कोंबड्याच्या या सवयीमुळे हैराण झाले आहेत. खरेतर हा कोंबड्याला त्यांनी औषध म्हणून थोडी थोडी दारू दररोज द्यायला सुरुवात केली. पण आता हा कोबंडा दारुशिवाय अन्नपाण्याच्या स्पर्शही करत नाही. त्याने काही खाल्ले नाही तर तो मरेल, म्हणून आता भाऊंना नाईलाजाने त्याला दररोज दारू पाजावी लागत आहे.
या कोंबड्याला मागील वर्षी मरीरोड जडला होता. त्यामुळे त्याने खाणेपिणे सोडले होते. त्यावर गावातील एका व्यक्तीने त्याला मोहफुलाची दारू देण्याचा उपाय सुचवला. आपला कोंबडा बरा व्हावा यासाठी भाऊंनी काही महिने त्याला मोहफूलाची देशी दारू पाजली.
त्यानंतर मोहफुलाची दारू मिळेनाशी झाल्याने त्यांनी विदेशी दारू द्यायला सुरुवात केली. कोंबडा आता आजारातून बरा झाला आहे, पण आता त्याला दारुचे व्यसन लागले आहे. स्वत: भाऊंना कसलेही व्यसन नाही, पण आपला लाडका कोंबडा जिवंत रहावा यासाठी ते त्याचे व्यसन चालवून घेतात.
दररोजच्या या दारूपायी त्यांना महिन्याला दोन हजाराचा भुर्दंड बसतो आहे. लपूनछपून दारू आणावी लागते ते आणी वेगळेच. आता त्यांनी कोंबड्याचे हे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता त्यांनी यावर उपाय सुचविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असला प्रकार पहिल्यांदाच पाहिला आहे. दारू पिणारा कोंबडा हे पहिल्यांदाच ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पाण्यात मिसळून दारू घेत असल्याने कोंबड्याला काहीही होणार नाही. पण जर दारू सोडवायची असेल तर दारूचा वास येत असलेल्या एखाद्या व्हिटॅमिनची औषध देणे सुरु करावे आणि हळूहळू त्याचे प्रमाण कमी केल्यास कोंबड्याची दारू सुटू शकते, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.