राजीव केळकर
भोर : महान्यूज लाईव्ह
मान्सून येण्याची जसजशी चाहूल लागते आहे, तशी शेतकऱ्याची लगबग वाढत चालली आहे. शेतीची हंंगाम जवळ येतो आहे, त्यामुळे सगळ्या साधनांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी मग्न आहेत. भोर तालुक्यातील पश्चिम पट्टा हा तसा तांदळाचे कोठार म्हणून समजला जातो.. डोंगरी भाग असून डोंगर सखल भागातील बऱ्यापैकी शेती यांत्रिक पद्धतीने केली जाते. यामध्ये ट्रॅक्टर, भात काढणी यंत्र, पेरणी यंत्र, इत्यादी यांत्रिक औजारांचा उपयोग केला जातो. त्यामुळे पारंपारिक शेती अवजारे दुर्मीळ होत चालली असली तरी ज्या ठिकाणी यांत्रिक अवजारे पोहोचत नाहीत त्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारांचा उपयोग सर्रास आजही केला जातो.
खेडोपाडी यासाठी एक विशेष परंपरा आहे. शेती अवजारे दुरुस्त करण्यासाठी मोबदला म्हणून शेतकरी कारागिराला ( सुतार ) वार्षिक खंड देत असतात, याला बलुते असेही म्हणतात. यामध्ये भाग तांदूळ याचा समावेश असतो. यामध्ये या कारागिरांनी वर्षभर अवजारांची देखभाल करायची असते. जून महिना आणि खरीप हंगाम जवळ येतो. मग या कारागिराकडे शेतकऱ्यांचे बोलावणे आले की प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन ही अवजारे दुरुस्त केली जातात.
मात्र येत्या काही वर्षात पारंपरिक अवजारे व चालू असलेली परंपरा लुप्त होणार यात शंका नाही…
टिटेघर येथील बाबु निगडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. आम्ही पूर्वीपासून बलुते पद्धतीने लाकूड काम करत असतो, आता लाकूड काम करणारी व खंडावर कामे करणारी आमची शेवटची पिढी असावी . पूर्वी गावामध्ये शंभर-दीडशे बैल जोडया होत्या.. त्यामुळे औत पण भरपूर असायची, सुगीच्या दिसात खळ्यावर बक्कळ बलूत मिळायच. घर प्रपंचाच्या आरामशीर चालायचा. आता यंत्राचा जमाना आल्यानं लाकूड सुतार काम करणाऱ्यांची तोंडची भाकरीच गेली. आमची पोर फर्निचर, कॉंक्रीट बांधकाम, वेल्डिंग अशी काम करत्यात ते आमच्या पिढीला जमत नाही.
जे काम मिळेल ते करायच आणि हक्काच दोन पैक गाठीला ठेवायचं, बाबु निगडेकरांचा कंठ हे सांगताना दाटून येत होता.