मुंबई : महान्यूज लाईव्ह
दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे ‘ बाळूमामाच्या नावानं चांगभलं ‘ या मालिकेच्या चित्रिकरणाचा सेट आहे. या सेटवर मालिकेसाठी आवश्यक प्राणीही राहत असतात. काल ( दि. ३१ मे ) रात्री या मालिकेच्या सेटवर मेकअपरुम, एडीट रुम आणि ऑफिसपर्यंत बिबट्या आरामात फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचाच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. दोन मेकअपरुममध्ये एक भिंत आहे. या भिंतीवरील विटा बिबट्याने पाडल्या आतमध्ये प्रवेश केला. शुटींग संपल्यानंतरची ही घटना आहे. यावेळेस मेकअपरुम तसेच ऑफिसमध्ये यावेळी कोणीच नव्हते. मात्र बाजूच्या एका खोलीत नुकतीच जन्मलेली कुत्र्यांची पिल्ले होती, त्यांच्या वासानेच बिबट्या आत शिरला असावा.
संतोष अयाचित यांनी आपल्या फेसबुकवर म्हणले आहे की, बिबट्याचा या परिसरातील वावर नेहमीचाच आहे. हा बिबट्यांचा परिसर आहे, त्यामुळे ते अधुनमधून दर्शन देत असतात. मालिकेच्या सेटवर गायी, घोडा, शेळ्या, मेंढ्या, बकरी, श्वान अशा सुमारे २१ प्रकारचे प्राणी राहत असतात. त्यांची देखभाल मालिकेच्या वतीने केअर टेकर घेत असतो.
यापूर्वी दोन महिन्यापूर्वी बिबट्याने सेटवर कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यावेळी सेटवरील लोकांनी बिबट्याला हुसकावून लावले होते. पण या हल्ल्यात खंडू नावाचे पिल्लू गंभीर जखमी झाले होते. वेळेत उपचार न मिळाल्याने या पिल्लाचा मृत्यू झाला होता.