शिरूर : महान्यूज लाईव्ह
कावळ पिंपरी येथील खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व सोबत इतर साथीदारांनी मिळून रोहिदास पाबळे याच्यावर अचानक हल्ला चढवत गावठी पिस्तुलातून गोळीबार करत व धारदार शस्त्रांनी वार करून रोहिदास पाबळे याचा खून केला होता.
सदर गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी व एक विधी संघर्ष बालक यास यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते.सदरच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी दिलीप रामा आटोळे ( वय ४४, रा. कावळपिंप्री, ता. जुन्नर. मुळ रा. मोहाडी धुळे) हा गुन्हा घडल्यापासून सतत आपला ठावठिकाणा बदलून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वास्तव्य करत होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलीप आटोळे हा पत्नीसह करंजाडे, पनवेल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन दिलीप आटोळे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे,सहायक फौजदार तुषार पंदारे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन,पोलिस नाईक मंगेश थिगळे,दगडू विरकर यांनी केली आहे.