माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली राजगड सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता कायम ठेवली असून काँग्रेसने १० जागावर बिनविरोध मिळविल्या होत्या. तर ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत देखील विक्रमी मतदान घेऊन काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले असून विरोधकांना अल्प मतदानावर समाधान मानावे लागले. विजयानंतर संचालक, काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.
राजगड सहकारी कारखाना अनंतनगर निगडे ( ता. भोर ) या कारखान्याच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. झालेल्या निवडणुकीत विरोधक व कॉंग्रेस अशी सरळ लढत होऊनही विक्रमी मतांनी काँग्रेसचे सातही उमेदवार विजय झाले असून विरोधकांना हार पत्करावी लागली. आमदार संग्राम थोपटे यांनी एकहाती सत्ता कायम राखून विरोधकांना राजकीय दणका दिल्याचे राजकीय जाणकारामधून प्रतिक्रिया उमटत आहे.
आज झालेल्या मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. कॉग्रेसचे उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, सोमनाथ वचकल, पोपट सुके, दिनकर धरपाळे प्रताप शिळीमकर हे विजयी झाले असून राष्ट्रवादीचे रामचंद्र कुडले, पंडित बाठे, रामदास गायकवाड तसेच भाजपचे विलास बांदल यांना हार पत्करावी लागली. विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाला. यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढीलप्रमाणे प्रभागनुसार अनुक्रमे उमेदवारांची नावे व मिळालेली एकूण मते भोर – देवपाल गट क्र. १ – उत्तम नामदेव थोपटे ४९९८, सुभाष मारुती कोंढाळकर, ५११७, रामचंद्र पर्वती कुडले ६३९, येवली – हातवे गट क्र. २ – सुधीर चिंतामण खोपडे ४६४९, सोमनाथ गणपत वचकल ४८७०, पोपट नारायण सुके ४९४२, विलास अमृत बांदल ८८४, पंडित रघुनाथ बाठे ४०५, ( रूळे, वरसगाव पानशेत ) गट क्र. ५. दिनकर सोनबा धरपाळे ५२७७, प्रताप धोंडीबा शिळीमकर ५१९६, रामदास किसन गायकवाड ६१५ अशी एकूण मते मिळाली आहेत.
राजगड कारखान्याच्या सात जागांसाठी निवडणूकीसाठी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे केले होते. परंतू कॉग्रेसची राजगडवर असलेली पकड व परंपरागत निवडणुकीत योग्य राबलेली यंत्रणा या जोरावरच कॉग्रेसचे सातही उमेदवार विजय झाल्याने पुन्हा एकदा विरोधकांच्या शहाला आमदार संग्राम थोपटे यांनी काटशह दिल्याने राजगड सहकारी कारखान्यावर पुन्हा एकहाती सत्ता कायम राहिली आहे.
भोर आणि राजगड पोलिस स्टेशनकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.