मुंबई : महान्यूज लाईव्ह
असा उशीरा आलेला पाऊस उरी घट्ट कवळावा,
बोलू नये त्याला उणेदूणे, काढू नये त्याचे अधिक उणे.
असा हा लहरी मान्सून. आजच्या आधुनिक काळातील हवामान तज्ञांनाही हुलकावण्या देणारा हा मान्सून आता केरळात दाखल झाल्याची खात्रीशीर खबर आहे. केरळमधल्या १४ पैकी १० पर्ज्यन्य निरीक्षण केंद्रांमध्ये आज पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे केरळात मान्सून आल्याची खात्री झाली आहे.
आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनपुर्व पाऊसाची प्रतिक्षा आहे. असा पाऊस झाला तर मान्सूनच्या वाऱ्यांना वाट मोकळी होईल. अंदमानात १६ मेला मान्सून पोचला. त्यानंतर तो लवकर केरळात येईल असे म्हणता म्हणता आज २९ मे रोजी दाखल झाला आहे.
राज्यातही पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तापमानातील चढ उतार नोंदले गेले आहेत. काही प्रमाणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे उद्यापासून ( ता. ३० ) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, वीजांसह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
वातावरणातील या अनुकुल बदलांमुळे राज्यातही मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत.