माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
वारंवार छेडछाड आणि फोनवरून मानसिक त्रासाला कंटाळून वेल्हे तालुक्यातील लव्ही गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाची रवानगी येरवडा तुरुंगात झाली आहे.
सानिका संजय उर्फ संतोष लक्ष्मण रेणुसे वय १९ रा. लव्ही ता. वेल्हे ( राजगड ) अशी आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ही घटना दिनांक १५ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस घडली होती. सानिकाने राहत्या घराचे पाठीमागील बाजूचे पडवीचे छताचे लोखंडी अंगलला ओढणीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
अविनाश मारुती रेणुसे, वय १९, असे आरोपीचे नाव असून आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्याला वेल्हे पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर आरोपी अविनाश रेणुसे याला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, सानिका ही दि. १५ मे रोजी स्वयंपाक करत असताना अविनाश याने फोनवरून सानिकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच यापूर्वी देखील सानिकाची त्याने छेडछाड केली होती. त्यावेळी अविनाशला सानिकाच्या नातेवाईकांनी समज दिली होती. तरी देखील तो वारंवार सानिकाची छेडछाड व मानसिक त्रास देत होता. नैराश्य आल्याने सानिका हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास उपनिरीक्षक महेश कदम करीत आहे.