नागपूर : महान्यूज लाईव्ह
घोड्यावरून नवरदेवाची निघालेली वरात रंगात आली होती. पण एक घटना घडली आणि सगळे आनंदाचे वातावरण दु:खात बदलून गेले. मामाच्या लग्नात उत्साहाने नाचणाऱ्या अवघ्या सहा वर्षाच्या भाच्याला घोड्याची लाथ बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
नागपूरच्या खापा येथील ही घटना. हशमेल सलमान शेख हे मृत बालकाचे नाव आहे. हशमेल आपल्या मामाच्या लग्नासाठी खापा येथे आला होता. बॅन्डच्या तालावर चाललेल्या वरातीत वऱ्हाडी मंडळी नाचत होती. नवरदेवही घोड्यावर बसून होता. त्यावेळी कुणीतरी दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली. यातील नोटा उचलण्यासाठी हशमेल घोड्याच्या मागे गेला. त्यावेळी घोड्याने जोरदार लाथ मारली. त्या लाथेने तो जवळच्या दगडावर फेकला गेला.
जखमी अवस्थेत हशमेलला कुटुंबियांनी खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर त्याला सावनेर येथे नेण्यात आले. पण तो वाचू शकला नाही. त्याच्या या अपघाती मृत्यूने सगळ्या लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली.