पुणे : महान्यूज लाईव्ह
काल ( ता. २७ ) रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोचण्याचा अंदाज असणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा हवामान खात्याला चकवा दिला. मान्सून काल पोचलाच नाही, आणि आता त्याची आणखी दोनतीन दिवस वाट पहावी लागण्याचा नवा अंदाज हवाखान खात्याने दिला आहे.
ताज्या हवामानशास्त्रीय अंदाजानूसार दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पातळीतील पश्चिमेकडील वारे तीव्र आणि खोल झाले आहेत. सॅटेलाईट इमेजनुसार केरळचा किनारा आणि लगतचा अरबी समुद्र ढगाळ आहे. त्यामुळे येत्या दोन – तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. ३० ते २ जून दरम्यान केरळमध्ये मान्सून सुरु होऊ शकतो, परंतू तो मजबूत असणार नाही.
केरळपासून पुढे येण्यासाठीही मान्सूनला वेळ लागतो. त्यासाठी सह्याद्रीच्या पूर्वेला पूर्व मोसमी सरी कोसळणे गरजेचे असते. त्यानंतरच संपूर्ण दक्षिण भारत काबीज करून मान्सून पुढे येईल व महाराष्ट्रासह मुंबईत दाखल होईल. यासाठी अरबी समुद्रात आवश्यक वातारवणीय बदल होणेही गरजेचे असते.
अर्थातच महाराष्ट्रातही मान्सून पुर्वीच्या अंदाजापेक्षा दोन तीन दिवस उशीरा येईल. पण केरळमध्ये मान्सून पोचल्यानंतरच याबाबत नक्की अंदाज वर्तवता येणार आहे. ५ जूनच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा शिडकावा होऊ शकतो. मात्र १३ ते २३ जून दरम्यान मध्यम स्वरुपाचा मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडू शकतो, असा सध्याचा तरी अंदाज आहे.
पण अखेर सगळे काही या लहरी मान्सूनच्या हाती आहे.