बारामती : महान्यूज लाईव्ह
कधी कधी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो आणि झाकलेली चार बोटे मात्र आपल्याकडेच असतात.. असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथील एका माजी पदाधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुपे येथे आले होते. त्यांनी या सुप्याच्या दौऱ्यात विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यादरम्यान आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विज बिल भरण्याविषयी लोकांना आवाहन केले.
त्यावेळी व्यासपीठावरील एका माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी, लाईट कमी मिळते दादा, शेतकरी चोरून कनेक्शन घेतात. त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी केली आणि नंतर दुसऱ्या दिवशी महावितरणने गंभीर दखल घेतली. सुप्याच्या परिसरात वीजचोरी शोधण्याची मोहीम सुरू केली.
अनेक ठिकाणाहून वीज कर्मचाऱ्यांनी अनधिकृतरित्या घेतलेली वीज कनेक्शन आकडे टाकून घेतलेल्या विज चोरीतील वायर गोळा केल्या. यात त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या दोन आकड्यांचाही समावेश होता हे विशेष.! त्यानंतर जेव्हा गावातील काही जणांनी या पदाधिकाऱ्यांना, कशाला तुम्ही बोललात? अहो सगळे आपले शेतकरीच असतात, असे म्हटल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे जाऊ द्या, माझे देखील दोन आकडे सापडले असे म्हटल्यावर उपस्थितांनी कपाळाला हात लावला.