सांगली : महान्यूज लाईव्ह
राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार्या निवडणुकीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना संधी मिळणार नसल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्रीपद भूषवलेल्या सदाभाऊ खोत हे यांनी भाजपच्या नेत्यांपेक्षा थोडे पुढे राहून महाविकासआघाडी वर जोरदार टीका केली आहे. मात्र यंदा त्यांना विधानपरिषदेचे संधी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भाजपशी युती झाल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यावेळी विधानपरिषदेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना आमदारकी देऊन कृषी राज्यमंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि रयत क्रांती संघटना ही नव्याने स्थापन केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सदाभाऊ खोत हे भाजपच्या नेत्यांपेक्षा जास्त प्रमाणात महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत, तसेच भाजपच्या अगदी जवळ गेले आहेत. तरी देखील यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना आणखी दोन वर्ष थांबावे लागेल.