सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
बारामती सहकारी बॅंकेने इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या दूध पुरवठादारांसाठी कर्ज मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास राज्यातील 10 जिल्ह्यांमधील दूध संकलन करणाऱ्या शीतकरण युनिटचे (चिलिंग प्लांट) चे मालक उपस्थित होते. या मेळाव्यात बारामती सहकारी बँक एक लाखापासून दहा लाखापर्यंत दूध पुरवठादारांना अर्थ साहाय्य करेल असे बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आले. (Baramati Co-operative Bank will provide financial assistance to milk suppliers from Rs 1 lakh to Rs 10 lakh, the bank said.)
या मेळाव्यामध्ये बारामती सहकारी बँकेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेल्या कर्ज योजनांची व दूध संकलन करणाऱ्या एजन्सी साठी अर्थ सहाय्य साठी उपलब्ध असलेले पर्याय याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव व उपाध्यक्ष रोहित घनवट यांनी दिली. बँकेचे कार्यकारी संचालक रवींद्र बनकर व इंदापूर शाखेचे शाखाधिकारी प्रशांत शेळके हेही यावेळी उपस्थित होते.
या मेळाव्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनपासून ते मोठ्या प्रमाणावरील दूध प्रक्रिया उद्योगासाठी बँकेकडून उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन नेचर डिलाईट डेअरी चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी केले.
या मेळाव्यात गणेश चिवटे,डॉ. सुरडे, हेमंत गलांडे, स्वप्नील शिंदे, विठ्ठलराव जाधव यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी नेचर डिलाईट डेअरी चे संचालक मयूर जामदार, डॉ.ज्योतीराम देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. सिंग उपस्थित होते. बारामती सहकारी बँक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेचर डिलाईट डेअरी च्या माध्यमातून 1 लाखापासून ते 10 लाखांपर्यंत त्यांच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार कर्जपुरवठा करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी जाहीर केले.