माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
नव्याने होत असलेल्या चेलाडी – नसरापूर सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे चव्हाट्यावर येत असतानाच या रस्त्याच्या कामासाठी चक्क विजेच्या खांबावर आकडा टाकून काम केले जात आहे. सजग नागरिकाच्या तक्रारीनंतर महावितरणने छापा टाकून वीजचोरी पकडली आहे. विशेष म्हणजे वीजचोरी पकडल्यानंतर देखील पुन्हा आकडा टाकून काम सुरूच होते.
रस्ता बनविण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावरुन व वीजवाहक तारावर आकडा टाकून गेल्या काही दिवसापासून सिमेंट काँक्रिटीकरण लेव्हलिंगसाठी वापरण्यात येणारी मशीन व होल मारण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर केला जात होता. याबाबत ग्राहक पंचायतचे दिलीप फडके याांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष ठिकाणी आकडा काढून वायर जप्त केल्या. संबंधित ठेकेदार आणि महावितरण कर्मचारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम यांनी याबाबत बोलताना सांगितले की, नसरापूर रस्त्याच्या कामाबाबत सर्व घटकातून संताप आणि आंदोलन होत असताना देखील अजूनही नियोजनबद्ध काम केली जात नाही. त्यांच्याकडे कामासाठी लागणारे साहित्य आणि यंत्रणा नसल्याने रस्त्याचे दर्जेदार काम होत नसून सळया देखील व्यवस्थित घातल्या जात नाही. तर कामाच्या सार्वजनिक विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप कदम यांनी केला.
महावितरण उपअभियंता नवनाथ घाटूळे यांच्याशी संपर्क साधला असता, रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला विनापरवाना विजेचा वापर केल्याबाबत वीज वापर झाला, त्याप्रमाणे वीज बिलाची दंडात्मक वसुली करणार असून पुन्हा आकडा टाकून वीजचोरी केली असल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती घाटुळे यांनी दिली.
तर ठेकेदार यांना आकडा टाकण्याचे सांगितले नसून इथून पुढच्या कामासाठी त्यांना स्वतः विजेची सोय करण्यासाठी सूचना देणार असल्याचे सार्वजनिक विभागाचे शाखा अभियंता प्रकाश गाडे यांनी सांगितले.