बारामती : महान्यूज लाईव्ह
आपल्या आजुबाजुच्या वातावरणाप्रमाणे माणुस घडतो. त्या वातावरणात तयार होणारे अन्न तो खातो, त्या हवेत श्वास घेतो, या सगळ्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रदेशात राहणारी माणसे परस्परांपासून वेगळी दिसतात. ग्रीक आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून हा फरक शोधण्याचे काम बारामतीच्या दोन तरुण संशोधकांनी केले आहे. त्यांच्या या शोधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे.
जिजा हरणोली ही मुळची बारामतीची युवती आणि बारामतीकर अभिषेक ढवाण यांचा या विषयावरचा शोधनिबंध ‘ कोरिलेशन बिटवीन स्टेपल डायट अँन्ड इट्स इफेक्ट ऑन फिजीकल अस्थेटिकस डेपिक्टेड इन पेंन्टींग्स, सकल्पचर अॅन्ड फिगराइन्स : ग्रीक व्हसेस इंडियन कल्चर ‘ हा शोधनिबंध ‘ जर्नल ऑफ फूड सायन्स अॅन्ड न्यूट्रीशन ‘ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला.
अभिषेक आणि जिजा यांनी यासाठी प्राचीन ग्रीक आणि भारतीय संस्कृतीतील कलाकारांना रेखाटलेल्या मानवी शरिरांचा अभ्यास केला आहे. रंगविलेली चित्रे आणि कोरलेली शिल्पे यांचा अभ्यास करून ग्रीक आणि भारतीय व्यक्तीच्या शरीरयष्टीतील फरकाचा त्यांनी अभ्यास केला. हा फरक का पडला असेल हे शोधण्यासाठी विशिष्ठ संस्कृतीतील व्यक्तींचा तेथील स्थानिक परिस्थितीनूसार असलेला आहार आणि त्यामुळे त्यांच्या शरीरयष्टीत पडलेला फरक याचा त्यांनी आधार घेतला. यानूसार ग्रीक संस्कृतीतील मानवी शरीर चित्रे ही भारतीय उपखंडातील मानवी चित्रे आणि शिल्पांपेक्षा जास्त पिळदार आणि सडपातळ दिसतात.
या शोधनिबंधात या दोन्ही संस्कृतीतील आहारात असणारे प्रथिने, त्यांची दिनचर्या, ते करत असलेले शारिरिक श्रम, त्यांचे खेळ आणि व्यायाम पद्धती या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या शरीरयष्टीवर पडला असल्याचे दाखवून देण्यात आले आहे.