इंदापूरकर लखोबा लोखंडेने बारामतीत येऊन पुणेकराला लावला चूना ! १ कोटीच्या जमिनीचा मालक म्हणून स्वत:च राहिला उभा !

बारामती : महान्यूज लाईव्ह

एकाची जमिन आपलीच असल्याचे दुसऱ्याने भासवून तिसऱ्याला विकल्याचा प्रकार उघड झाला असून यामध्ये किशोर हनुमंत खाडे ( रा. रुई, ता. बारामती ) यांनी आपली १ कोटी १५ लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

लाकडी ( ता. इंदापूर ) येथील ३ हेक्टर ४८ आर शेतजमिन आपलीच असल्याचे भासवून दोघाजणांनी किशोर हनुमंत खाडे यांच्या नावावर करून दिली होती. परंतू या जमिनीच्या मूळ मालकाची गाठ पडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खाडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

शहाजी नरुटे या काझडमधील इस्टेट एजंटाने खाडे यांची या जमिनीचे मालक नरेश दुसरीचा आहेत म्हणून एका व्यक्तीशी भेट घडवून आणली. त्या व्यक्तीने आपणच जमिनीचे मालक असल्याचे सांगितले. यानंतर खाडे हे लाकडी येथील जमिन पाहण्यासाठी गेले. त्यावेळी ज्यांनी आपण मालक आहोत अशी ओळख करून दिली ते आणि प्रशांत जगताप तेथे आले होते. दुसेजा म्हणून एका व्यक्तीने ही जमीन आपली असल्याचे सांगितले.

त्यानंतर १ कोटी १५ लाखाला हा सगळा व्यवहार ठरला. किशोर खाडे यांनी प्रथम १२ लाखाची इसार पावती केली. ही रक्कम त्यांनी चेकव्दारे नरेश दुसेजा या नावाने दिली. त्यानंतर या जमिनीचा व्यवहार संजय वामन ढोले ( रा. लाकडी ) यांच्यासोबत यापूर्वीच झाल्याचे त्यांना समजल्याने त्यांनी दुसेजा आणि ढोले दोघांशीही संपर्क साधला. यावेळी दुसेजा यांनी ढोले यांच्याकडून घेतलेली इसार पावती रद्द करून त्यांना रक्कम करतो असे सांगितले.

यानंतर या जमिनीचा दस्त करतानाही तो शासकीय रकमेने करण्याचा आग्रह जमिनीचा मालक असल्याचे सांगणाऱ्या दुसेजा आणि जगताप यांनी धरला. त्यामुळे २४ लाख रुपये किंमतीचाच दस्त करण्यात येऊन तेवढीच रक्कम चेकव्दारे दिली गेली. उर्वरीत ८८ लाख ६५ हजाराची रक्कम रोख स्वरुपात दिली गेली. १० मे रोजी हा दस्त होऊन सर्व व्यवहार पुर्ण करण्यात आला.

यानंतर २० मे रोजी बारामतीतील एका वकिलांनी खाडे यांना फोन करून तुम्ही बनावट व्यक्तीशी व्यवहार केला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या वकिलांनी खाडे यांची या जमिनीचे मुळ व खरे मालक नरेश दुसेजा यांच्याशी त्यांची भेट घालून दिली. संबंधित खऱ्या नरेश दुसेजा यांनी त्यांच्याकडील अस्सल कागदपत्रे दाखवली.

त्यानंतर खाडे यांनी ज्यांच्याशी व्यवहार केला, त्या व्यक्तीने देखील दुसेजा नावाने दिलेली पॅन, आधारकार्ड ही वास्तवात बनावट असल्याचे खाडे यांच्या लक्षात आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी त्यांनी नरेश दुसेजा आणि प्रशांत जगताप अशी नावे सांगणाऱ्या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिस खात्यातील काहीजण साक्षीदार होते अशीही माहिती मिळत असून याचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत आहे.

tdadmin

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

7 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

23 hours ago