राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
जिल्हा परिषदेचे बनावट सहीशिक्के वापरून आरोग्य खात्यात राजरोसपणे केल्या गेलेल्या भरतीचा ‘ महान्यूज लाईव्ह ‘ चे संपादक ज्ञानेश्वर रायते यांनी नुकताच भांडाफोड केला होता. ‘ महान्यूज लाईव्ह ‘ च्या या दणक्यानंतर आता जिल्हा परिषदेला जाग आली असून पुणे जिल्ह्यात आता या प्रकरणी ५ ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले आहेत.
दौंड तालुक्यात राहू व देऊळगाव, बारामती तालुक्यात सांगवी व होळ तर इंदापूर तालुक्यात निरवांगी व लासुर्णे या ठिकाणी अशा बनावट सहीशिक्क्यांच्या आधारे कर्मचारी कामावर घेतले गेले होते. जिल्हा परिषदेने आता केलेल्या सखोल चौकशीत या सर्वांची नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे आढळून आले आहे. दौंड तालु्क्यात अशा प्रकारे बनावट नियुक्तीपत्रावर काम करत असलेल्या सुरज दत्तात्रय खारतोडे ( वय २६, रा. कळस, ता. इंदापूर ) या व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे. सदर व्यक्ती देऊळगावराजे येथे अधिपरिचारक पदावर काम करत होता. या प्रकरणी देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश आलमवार यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
राहू तेथे राजकुमार लक्ष्मण शेटे ( रा. शरदनगरा, चिखली, पुणे आणि विक्रम बाळू बंडगर ( रा. कुंभारगाव, ता. इंदापूर ) या दोन व्यक्तीही अशाच प्रकारे अधिपरिचारक या पदावर बनावट नियुक्तीपत्राव्दारे काम करत होत्या. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दौंडप्रमाणेच बारामती तालुक्यातील सांगवी व होळ व इंदापूर तालुक्यातील निरवांगी व लासुर्णे या ठिकाणी अशाच प्रकारे जिल्हा परिषदेचे बनावट नियुक्तीपत्र सादर करून अधिपरिचाक पदावर काही व्यक्ती काम करत होत्या. त्यांच्यावरही आता गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा सगळा प्रकार ‘ महान्यूज लाईव्ह ‘ ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेने कारवाई सुरु केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक महान्यूजचे अभिनंदन करत आहेत.