माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
चेलाडी ते नसरापूर रस्त्याचे नव्याने होत असलेले काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे आणि वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी यांनी चक्क याच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उंच वडाच्या झाडावर बसून आगळेवेगळे आंदोलन सुरू केले आहे. झाडावर चढून आंदोलन केल्याने रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी याचे लक्ष वेधले आहे.
नव्याने होत असलेल्या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे व वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांच्यासह प्रहारचे टिटेघर शाखाध्यक्ष हनुमंत सुतार, करंजे शाखा अध्यक्ष रवींद्र तामकर हे झाडावर बसून आगळेवेगळे आंदोलन सुरू ठेवले आहे. यावेळी प्रहारचे उपाध्यक्ष सचिन नवघणे, वांगणीचे शाखाध्यक्ष आकाश टकले, आळंदीचे शाखाध्यक्ष मयुरेश शिंदे, प्रहार जनशक्ती भोर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते उपस्थित होते.
घटनास्थळी राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय ढावरे, एस. जी. आखाडे, महिला पोलीस हवालदार प्रतिमा भांड, गोपनीय विभागाचे भगीरथ घुले, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता संजय संकपाळ, शाखा अभियंता प्रकाश गाडे, महसूल विभागाचे मंडलधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, कोतवाल विजय गयावळ दाखल झाले आहे. या आंदोलनाबाबत राजगड पोलिसांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील अद्यापही सार्वजनिक विभागाचे अधिकारी आंदोलनाच्या उशिरा दाखल झाले आहे.
चेलाडी ते नसरापूर येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याला वाहतुकीपूर्वीच भेगा पडल्या असून निकृष्ट कामाकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. तसेच रस्त्याच्या कामावर नागरिकांच्या माहितीसाठी रस्त्याच्या कामाचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. वाहतुकीचे कारण सांगून रस्त्याचे रात्रीचे कामे केले जातात. यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येत नाही. काम चालू असताना वाहतूक नियंत्रण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी असताना, वार्डन नेमणूक वाहतूक नियोजन केले गेले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे.
प्रहार जनशक्ती भोरचे अध्यक्ष संतोष मोहिते म्हणाले की, संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी होऊन ठेकेदाराच्या निकृष्ट केलेले काम पूर्ण पुन्हा उकरून नव्याने काम कमीत कमी कालावधीत पूर्ण करावे. बांधकाम विभागाच्या निरीक्षकास समोर करण्यात यावे. या कामाच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठेकेदारावर विभागाचे स्थानिक अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचे आरोप संतोष मोहिते यांनी केला आहे. राजगड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना झाडावरून खाली येण्याचे आवाहन केले मात्र त्यांनी नकार देत लेखी हमी दिल्याशिवाय खाली उतरणार नाही असा पवित्रा घेत आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे.