मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारचा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालात १४.९ टक्के जैनधर्मीय पुरुष आणि ४.३ टक्के जैनधर्मीय स्त्रिया या मासांहार करत असल्याचे म्हणले आहे. यावरुन जैन समाजात नाराजी असून हा अहवाल मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय जैन माइनॉरिटी ऑर्गनाइजेशनने केली आहे.
जैन धर्म हा अहिंसावादी आणि शाकाहारी आहे. या धर्मातील लोक मासांहार करत असल्याची अहवालातील माहिती चुकीची आहे. या माहितीमुळे जैन धर्म बदनाम होत आहे. हे सर्वेक्षण चुकीच्या माहितीवर आधारीत असून असा बिनबुडाचा अहवाल दिल्याने सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
हा अहवाल तयार करताना आम्हाला कोणी विचारायलासुद्धा आलेले नाही, त्यामुळे हा अहवाल मागे घ्यावा अन्यथा सकल जैन समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा राष्ट्रीय जैन माइनॉरिटी ऑर्गनायजेशनचे जालना जिल्हाध्यक्ष मयुर बाकलीवाल यांनी दिला आहे.