बारामती : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने डिझेल पेट्रोलचे दर कमी केली असले, तरी राज्य सरकारने यापूर्वीच अर्थसंकल्पात तरतूद करून एक हजार कोटी रुपयांचा बोजा सहन करत दर कमी केले आहेत. आता जे दर केंद्र सरकारने कमी केले आहेत, ते दर तसेच कमी राहावेत, अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असे निमित्त सांगून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर त्याच किंमतीवर आणून ठेवतील. असे होऊ नये एवढीच अपेक्षा असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत व्यक्त केले.
आज बारामती अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, मात्र असे असले तरी देखील हे दर अशीच कायम कमी राहावेत, अन्यथा पुन्हा त्याच स्थितीवर हे दर आले, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेलाच्या किमती वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यानुसार केंद्र सरकार या तेलाच्या किमती वाढवते किंवा कमी करते. कोणतेही सरकार असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली पाहिजे.
राज्य सरकारने यापूर्वीच हे दर कमी केले आहेत राज्य सरकारने त्यांचा कर कमी करताना सर्वसामान्य माणूस टॅक्सी चालक वाहन चालक या सर्वांचा विचार केला आणि एक हजार कोटींचा बोजा सहन करत यापूर्वीच सीएनजीचा दर कमी केले मात्र हे दर पुन्हा वाढले आहेत असे देखील पवार म्हणाले.