औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
एकतर्फी प्रेमातून आणखी एका तरुणीचा बळी गेला आहे. औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कशीशला एका तरुणाने एकतर्फी प्रेमाच्या विकृतीतून गळ्यावर तब्बल १८ वार करून आयु्ष्यातून उठवले आहे.
ही भयानक घटना काल शनिवारी भरदिवसा घडली आहे. सुखप्रीत कौर उर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी ( वय १८, रा. उस्मानपूरा ) आणि शरणसिंग सेठी ( वय २०, भीमपूरा, उस्मानपूरा ) हे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग गेले अनेक दिवस कशीशच्या मागे होता. तिच्या घरच्यांनीही त्याला समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणींसोबत देवगिरी महाविद्यालयात आली, त्यावेळी शरणसिंग तिथे आला. त्याने कशीशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिला भेटण्याचा आग्रह धरला. त्यानंतर दुपारी चनाकार कॉलनीजवळील कॉफीच्या दुकानात कशीश मैत्रिणींसोबत गेली. तिथेही तो आला. कशीश दुकानाबाहेर पडताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला जवळच्याच एका प्लॉटच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. सोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला, पण तो तिला त्या प्लॉटवर ओढत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्या मानेवर व पोटावर तब्बल १८ वार केले आणि तो तेथून दुचाकीवरून पळून गेला.
मैत्रिणींनी कशीशच्या भावाला फोन करून कळवल्यावर दोन्ही भाऊ येऊन कशीशला दवाखान्यात घेऊन गेले. परंतू उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. आता शरणसिंगच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला असून पोलीस त्याला शोधत आहेत.
महिलेला आपली मालमत्ता समजणाऱ्या या पुरुषी अहंकारातून दर दोन चार महिन्यांनी अशा घटना कुठे ना कुठेतरी घडत असतात. खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेचा अर्थ समजल्याशिवाय याला आळा घालणे अशक्य आहे. यासाठी सततच्या समाजप्रबोधनाची गरज आहे.