दिल्ली : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने महागाईने धास्तावलेल्या देशभरातील ग्राहकांना मोठा दिलासा देत महागाईचा मार सोसणाऱ्या जनतेला एक चांगली खुशखबर दिली आहे. आज रात्रीपासून पेट्रोलचे दर साडेनऊ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात सात रुपये प्रति लिटर कपात होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या दरात झालेली वाढ लक्षात घेत पेट्रोलियम कंपन्यांकडून सातत्याने दरवाढीचे संकेत दिले जात आहेत. मात्र आता आहे त्यापेक्षा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले तर जनतेचे कंबरडे मोडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या पेट्रोल पंप चालकांना डिझेल कृत्रिम टंचाई निर्माण करून कमी डिझेल पुरवत आहेत.
अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याची भीती व्यक्त होत असतानाच, आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने अबकारी दरात कपात करून टोल साडेनऊ रुपये प्रति लिटर दराने तर डिझेल सात रुपये प्रति लिटर दराने कपात करण्याचे आज जाहीर केले.
केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कात पेट्रोलमध्ये आठ रुपये प्रति लिटर आणि डिझेलमध्ये सहा रुपये प्रति लिटर कपात केली आहे. त्याचे परिणाम म्हणून पेट्रोल आज मध्यरात्रीपासून साडेनऊ रुपये प्रति लिटर डिझेल सात रुपये प्रति लिटर कमी दराने मिळू शकेल.
केंद्र सरकारने यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशाच स्वरूपात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.