माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडीत तालुक्यात नेहमीप्रमाणे आघाडीत बिघाडी करणाऱ्या भोर मधील विरोधकांनी आयत्यावेळी भाजप बरोबर जाऊन आघाडी बिघडवण्याचे काम केले असून राजगड कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमची भुमिका सभासदांसमोर मांडुन उर्वरीत सात जागाही जिंकु असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथील बनेश्वर मंदिरात अभिषेक व पुजा करुन काँग्रेस प्रणित राजगड सहकार पँनेलच्या प्रचाराचा श्रीफळ फोडून नसरापूरमध्ये शुभारंभ आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, वार्ड क्रमांक १ चे उमेदवार उत्तम धोपटे, सुभाष कोंडाळकर, वार्ड क्रमांक २ चे उमेदवार सुधीर खोपडे, पोपट सुके, सोमनाथ वचकल, वार्ड क्रमांक ५ चे उमेदवार दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर, तसेच बिनविरोध निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे, शिवाजीराव कोंडे, के.डी सोनवणे, उत्तम थोपटे, संदिप नगिणे, अशोक शेलार, विकास कोंडे, दत्तात्रय चव्हाण, चंद्रकांत सांगळे, शोभा जाधव, सुरेखा निगडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले कि, राजगड कारखान्याचे जे सभासद नाहीत, हितचिंतक नाहीत ज्यांचा ऊस नाही. कारखान्याबाबत कसलेही योगदान नाही अशा तालुक्यातील विरोधी नेत्यांनी राजगड कारखान्याची निवडणुक सात जागांसाठी लादली आहे. तरी सुध्दा आम्ही सर्व सभासदांपर्यंत जाऊन आमच्या राजगड सहकार पँनलची भूमिका मांडून सर्व सातही जागा जिंकु असा विश्वास करत थोपटे पुढे म्हणाले की, कारखाना आर्थिक अडचणीतुन जात असतानाही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. विरोधकांचे काही संचालक घेण्याची तयारी दाखवली परंतु त्यांच्या मध्येच एकमत नसल्याने ही निवडणुक लागली आहे.
तर आभार प्रदर्शन करताना तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे म्हणाले की, तालुक्यातील तीन पक्षांनी एकत्र येऊन वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असताना देखील १७ जागांपैकी चार जागांवर त्यांना उमेदवार देताना त्यांच्या नाकी नऊ आले आहे. उगीच विरोधाला विरोध म्हणून त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा असून यातच त्यांचा पराभव असल्याची टीका सोनवणे यांनी केली.