शिरूर : महान्यूज लाईव्ह
निर्वी (ता.शिरूर) येथे शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बबन बाबुराव माळवदकर (वय.५५, रा. निर्वी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी राहुल बबन माळवदकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडील बबन बाबुराव माळवदकर यांनी गुणाट येथील गोरख सरोदे यांच्याकडून उसने घेतलेले पैसे परत दिले असताना देखील व्याज स्वरूपात अधिक रक्कमेची मागणी सरोदे यांनी करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणामुळे राहुल यांच्या वडिलांनी शेतातील आंब्याचे झाडाला दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले की, सदर घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून मयत व्यक्तीकडे आत्महत्येबाबत चिठ्ठी सापडली आहे.
त्यानुसार गोरख सरोदे, त्याची पत्नी व आई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.