दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
स्थळ : पाचगणी येथील प्रसिद्ध अंजुमन इस्लाम पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेज… वेळ सकाळी दहा वाजताची.. आणि अचानक दहा फूट उंचीच्या पायर्या चढून अनाहूतपणे एका पाहुण्याने प्रवेश केला.. सारेजण दचकले.. कारण समोर होते चक्क हरीण..!
माणसांच्या गर्दीत माणसांना न्याहाळताना वन्य प्राणी दचकतात आणि इथे मात्र कुणाचीही भीती न बाळगता हे हरीण मुक्तपणे सगळ्या कॉलेजमध्ये फिरू लागले. आणि एखाद्या अनाहूत अभ्यागतांचे आगमन झाल्यानंतर कपाळावर आट्या पडतात, मात्र इथले सारे कर्मचारी इथे मात्र हरणाच्या प्रवेशाने सुखावले.
यावेळी अंजुमन संस्थेचे संचालक बशीर पटेल हे हा क्षण पाहण्यासाठी आपल्या खुर्चीतुन उठून बाहेर व्हरांड्यात आले. हरणाचा हा मुक्त संचार पाहून त्यांनाही आनंद झाला. पटेल म्हणाले, पाचगणी हे शहर राज्यात देशात आणि परदेशात शिक्षणाचे धडे देऊन शाश्वत विद्यार्थी घडवणारे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
या शहरात सन १९२० साली तब्बल १६८ एकर जमीन खरेदी करुन त्या मध्ये अंजुमन इस्लाम पब्लिक स्कुल नावाची शिक्षण संस्था उभी करुन त्या मार्फत येथे निसर्गाच्या सान्निध्यात ज्युनियर कॉलेज चालविले. १६८ एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे, त्या जंगलात विविध प्रकारचे वन्य प्राणी सुरक्षितपणे अधिवास करीत असतात. हा सुरक्षितपणा वन्यप्राण्यांना कॉलेजमध्येही जाणवला हे विशेष.
दरम्यान याप्रकरणी बशीर पटेल यांनी महाबळेश्वर विभागाचे वन अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना माहिती दिली. कुलकर्णी यांनी वन कर्मचारी संजय भिलारे यांना त्यांनी तेथे पाठवून ते हरीण ताब्यात घेऊन त्याला पुन्हा अंजुमन परिसरात असलेल्या जंगलात सोडुन दिले. या वेळी अंजुमनचे जाफर शेख, सादिक शेख, कदीर शेख, इकबाल पठाण उपस्थित होते.