दौंड : महान्युज लाईव्ह
जन्मदात्याच्या नावावर असलेली ३.७५ एकर जमीन नावावर केलीच पण वडीलाच्या मृत्यू नंतरही वडीलांच्या नावावर राहिलेली आणि आईच्या नावावर असलेली जमीन स्वतः च्या नावावर करण्यासाठी मावस भाऊ,चुलता यांच्या मदतीने मुलगा दबाव आणत आहे. मानसिक छळ करीत आहे. याप्रकरणी तिघांवर पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
प्रकाश गणपत दिवेकर ( रा. वरवंड ता.दौंड जि. पुणे ) मच्छींद्र नारायण शितोळे (रा. रोटी ता. दौंड जि पुणे ) व तुकाराम दिवेकर ( रा. वरवंड ता.दौंड जि पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील गणपत भुंजग दिवेकर यांच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतः च्या नावावर करण्यासाठी मुलगा प्रकाश याने नोव्हेंबर २०१५ मध्ये पावणेचार एकर जमीन जबरदस्तीने नावावर करून घेतली व त्यानंतर राहिलेली २.७५ एकर शेतजमीन आणि आई ताराबाई यांच्या नावावर असलेली १.७५ एकर शेतजमीनही नावावर करून घेण्यासाठी वडीलांवर मानसीक दबाव आणला व त्यांना जबरदस्तीने बारामती येथुन वरवंड येथे आणुन ठेवले . जमीन नावावर करण्यासाठी वारंवार दबाव आणुन मानसिक छळ केला. त्यामुळे गणपत यांनी मानसिक दबावाला व छळवणुकीला कंटाळुन १० जानेवारी २०२२ रोजी शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.
वडीलांच्या निधनानंतर आईलाही जमीन नावावर करण्यासाठी दबाव आणत असल्याने अखेर आईने पाटस पोलीस चौकी गाठली पोलिसांना सर्व हकीकत सांगितली.
आई ताराबाई गणपत दिवेकर ( वय ६५ मुळ रा. वरंवड ता. दौंड.जि. पुणे सध्या रा. बारामती) यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने मुलगा प्रकाश, बहिणीचा मुलगा मच्छिंद्र आणि दिर तुकाराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत.