दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरंवड येथील ऋषिकेश मच्छिंद्र दिवेकर या १६ वर्षाच्या मुलाने वडिल आणि सावत्र आईच्या छळाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सावत्र आई व वडील या दोघांना पाटस पोलीसांनी अटक केली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
मच्छिंद्र बापुराव दिवेकर व शुभांगी मच्छिंद्र दिवेकर (रा.वरंवड,ता.दौंड जि.पुणे ) अशी अटक केलेल्या आई वडीलाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश हा वरंवड येथे वडील मच्छिंद्र व सावत्र आई शुभांगी यांच्या सोबत राहत होता.
या दोघांनी ऋषिकेश ला घरामध्ये फरशी व्यवस्थित पुसत नाही, कपडे धुवत नाही,भांडी घासत नाही. आईला सारखा फोन करतो व दुसऱ्यांच्या घरामध्ये जावुन काही खातो. या कारणावरून ऋषिकेशला हाताने व पट्याने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करीत असल्याने त्या त्रासाला आणि छळाला कंटाळून ऋषिकेश याने राहत्या घरी ४ मार्च २०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी ऋषीकेश याची आई अमृता मच्छिंद्र दिवेकर ( वय 34, सध्या रा. कुडजे ता.हवेली जि.पुणे मुळ रा. वरवंड ता. दौंड जि.पुणे) यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने सावत्र आई शुभांगी व वडील मच्छिंद्र यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव
वाबळे हे करीत आहेत.