बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये काल काही जण थेट ‘परमनंट’ नोकरीची नियुक्तीपत्रे घेऊन थेट रूजू होण्यासाठी पोचले.. सतर्क आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे ही नियुक्ती पत्रे बोगस असल्याचे सिद्ध झाले, मात्र मौनात असलेल्या जिल्हा परिषदेला ‘महान्यूज’ च्या दणक्यानंतर 24 तासानंतर जाग आली.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
काल इंदापूर व बारामती तालुक्यातील निरवांगी, सांगवी, होळ येथील सरकारी दवाखान्यांमध्ये बारावी ते पदवीचे पहिले, दुसरे वर्ष एवढेच शिक्षण झालेली काही मुले राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिपरिचारक व अधिपरिचारिका पदाच्या नियुक्तीची पत्रे घेऊन गेली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेल्या या पत्रामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या मुलांना सुरुवातीला चांगली वागणूक दिली, मात्र जेव्हा ही पत्रे नीट वाचली गेली तेव्हा स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
अर्थात इंदापूर व बारामती तालुक्यात अजूनही काही ठिकाणी ही मुले अशा प्रकारची नियुक्तीची पत्रे घेऊन गेली असल्याची चर्चा असून जिल्ह्याच्या इतरही तालुक्यांमध्ये आरोग्य दवाखान्यांमध्ये अशा प्रकारची नियुक्तीपत्रे घेऊन उमेदवार गेले होते अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
हा प्रकार काल म्हणजे शुक्रवारी दिवसभर सुरू होता. अतिशय गंभीर होता. मात्र जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकार्याने यावर टिप्पणी केली नाही. मात्र काल संध्याकाळी महान्यूज ने उघडलेल्या मोहिमेनंतर जिल्हा परिषदेला जाग आली आणि त्यांनी आज शनिवारी जिल्हा परिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुक पेजवरून पोस्ट करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत एवढीच टिप्पणी केली.
या नियुक्ती पत्रामध्ये काय आहे?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेअंतर्गत आरोग्य केंद्रांमध्ये अधिपरिचारिका व अधिपरिचारक पदावर उमेदवारांना नियुक्त केले जाते. मात्र त्यासाठी नर्सिंग स्टाफ योजनेअंतर्गत विहित प्रशिक्षण घेतलेले उमेदवारच नियुक्त केले जातात. त्याचप्रमाणे ही नियुक्तीपत्र देताना ते कंत्राटी स्वरूपाचे असतात, मात्र काल पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची पत्रे घेऊन जे उमेदवार इंदापूर तालुक्याच्या तीन आरोग्य केंद्रावर व बारामतीच्या होळ, सांगवी येथील आरोग्य केंद्रावर गेले होते, त्यांच्याकडील नियुक्तीपत्रे बनावट होती.
या उमेदवारांनी आणलेली नियुक्ती पत्रे ही राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत कायमस्वरूपी तत्त्वावर नियुक्तीची होती. तसेच वेतन मर्यादा देखील थेट 35 हजार400 रुपये ते 1 लाख 12 हजार रुपयांपर्यंत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला.
अर्थात या नियुक्त्ती पत्रांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्के आहेत. हे शिक्के या मुलांकडे कुठून आले? या अनेक जणांना एकाच 20 नियुक्तीपत्रे कशी मिळाली? आणि याच्या मागील रॅकेट नेमके काय आहे? हे शोधून काढणे जिल्हा परिषदेचे काम आहे. काल दिवसभरात जर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असता तर आज पर्यंत काही जणांकडून छडा देखील लागला असता. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यावर बाळगलेले मौन संशयास्पद आहे.
आज सकाळी जिल्हा परिषदेच्या अधिकृत पेजवर या संदर्भातील माहिती देण्यात आली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे यामध्ये त्रोटक स्वरूपात स्पष्ट केले गेले. मात्र काल दिवसभरात यावर निर्णय का झाला नाही? व तातडीने पावले का उचलली नाहीत? हा देखील एक संशयाचा मुद्दा या ठिकाणी आहे.
ही पत्रे मूळ नियुक्ती पत्रांवरून स्कॅन केलेली असावी असा संशय आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र बोगस नियुक्त्या देण्यामागे एखादे रॅकेट असावे असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या संदर्भात इंदापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय सरतापे व बारामती तालुक्याचे आरोग्याधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील हा प्रकार घडल्याची माहिती दिली दरम्यान स्थानिक कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला असल्याचे सांगत त्यांनी संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यापूर्वीच ते निघून गेल्याची माहिती दिली.