सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यावर अन्याय होत आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आमची लढाई संपणार नाही, त्यासाठी सरकारला जेरीस आणू,असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे शुक्रवारी ( दि.२० ) इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत सभेचे आयोजन केले होते. सदर प्रसंगी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.
ते पुढे म्हणाले, नृसिंह अवताराने अनाचार, अत्याचार, व्याभिचार,पथभ्रष्ट सत्ता या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला. श्री लक्ष्मी-नृसिंहाने अनाचारी वृत्ती, अत्याचार वृत्ती विरोधात लढण्याची ताकद द्यावी,असे आशीर्वाद मी व हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, मी लहानपणापासून येथे दर्शनासाठी येत आहे. सन १९९७ ला मी महापौर झाल्यानंतर येथे दर्शनाला आल्यानंतर विकासाची इच्छा मनात आली. लक्ष्मी-नृसिंहाने आशिर्वाद दिला व २०१४ ला मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मी मंजूर केलेला श्री लक्ष्मी-नृसिंह तिर्थस्थळ विकासाचा २६४ कोटी रुपयांचा आराखडा सध्या पूर्णत्वास येत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काम करताना अडथळे निर्माण केले जात असल्याच्या हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, श्री लक्ष्मी-नृसिंहाची ताकद सर्वांना माहित आहे. नृसिंहाचे आशीर्वाद आपले पाठीशी आहेत. त्यामुळे हर्षवर्धनजी काळजी करू नका, येथील सर्व विकास कामे पूर्ण होण्यास अडचण येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील यांचे पासून कोणतीही निवडणूक असो अथवा विकास काम असो येथील लक्ष्मी-नृसिंहाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही शुभारंभ करतो. इंदापूर तालुक्यातील जनता भाजपवर प्रेम करणारी आहे. देवेंद्र फडणवीस व भाजपने आदेश द्यावा, इंदापूर तालुक्यातील जनता आपली ताकद दाखवून देईल. राज्यात जनतेची विकासकामात अडवणूक होत आहे, ती दूर करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे साकडे लक्ष्मी-नृसिंहाकडे घातले असल्याची हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्री लक्ष्मी-नृसिंह हे जागृत देवस्थान आहे. श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांचे पाठीशी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला प्रगतीची व विकासाची नवी दिशा मिळावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.राहुल कुल, आ.राम सातपुते, पृथ्वीराज जाचक, रंजनकाका तावरे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अंकिता पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, हनुमंतराव सूळ, मयुरसिंह पाटील, भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकील भाई सय्यद व इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी आभार मानले. स्वागत सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.