शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील विविध मागण्यासाठी दि.२३ पासून साखर आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि.२६ डिसेंबर २०१८ पासून घोडगंगा सहकारी साखर कारखाना चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक,प्रादेशिक सहसंचालक (साखर)पुणे विभाग व साखर आयुक्त कार्यालय यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र कुठल्याही पत्रावर कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्यास मागील ५ गळीत हंगामामध्ये आलेल्या उसाची गाव निहाय व व्यक्ती निहाय वजनासहीत यादी मिळावी,सभासद आय नमुना रजिस्ट्ररची साक्षांकित (सुरुवातीपासून ते ३०/०४/२०२२ पर्यंत)ची प्रत मिळावी,सभासदांची कारखान्याकडे गेली १३ वर्षांपासून असणारी ठेव तसेच ठेवीवर आजपर्यंत झालेले व्याज सभासदांना मिळावे,मयत सभासदांच्या वारसांची वारस नोंद करून आगामी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा अधिकार मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास २३/०५/२०२२ पासून आपल्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.