बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील बाजार समितीच्या निर्यात केंद्रातून सन 2015 पासून निर्यात करत असलेल्या रेनबो इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या फळे निर्यातदार संस्थेने या वर्षी तर कमाल केली आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होत असून या वर्षी रेनबो इंटरनॅशनल या संस्थेने जळोचीतून निर्यात केलेले आंबे थेट आता व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहेत.
गुरुवारी अमेरिकेत वॉशिंग्टन या राजधानीत भारतीय आंबा प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये या आंब्यांची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आली. ती पेटी आज म्हणजे शुक्रवारी व्हाइट हाउसकडे पोहोचणार आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार असलेल्या या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या निर्यातीला पुन्हा एकदा वाव मिळाला असून अमेरिकेमध्ये सध्या भारताच्या आंब्याचा प्रचार सुरू आहे.
या प्रचाराच्या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेतील भारताचे राजदूत करणजीत सिंग संधू हे वॉशिंग्टन येथे आंबा प्रचार कार्यक्रमात या आंब्याची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करणार आहेत. हे आंबे बारामतीतील जळोची येथील निर्यात केंद्रातून रेनबो इंटरनेशनल या निर्यात संस्थेने पॅकिंग केले आहेत.
आंध्रप्रदेशातील हिमायत आणि बैगनपल्ली या आंब्याच्या जातींसह महाराष्ट्रातील केशर, हापूस, मानकूर या पाच जातींचा त्यात समावेश करण्यात आला. रेनबो इंटरनेशनल संस्थेचे संचालक अभिजीत भसाळे यांनी यासंदर्भात ‘महान्यूज’शी बोलताना माहिती दिली.
भसाळे म्हणाले की, यावर्षी आतापर्यंत 400 टन आंबा निर्यात करण्यात आला असून, सन 2015 पासून बारामतीतील जळोची येथे रेनबो इंटरनॅशनल या संस्थेचे पॅक हाउस कार्यान्वित करण्यात आले आहे. यावर्षी अमेरिका, इस्राईल, कॅनडा सह 31 देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.
दरम्यान या आंब्याचे कनेक्शन बारामती शी जोडत असल्याने या संदर्भात सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियावर याची माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा..!