दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील मळद येथे मागील दोन वर्षांपासून फरार असलेला दरोड्यातील आरोपी मंगेश ऊर्फ मयूर भगवान चव्हाण (रा. वाखारी केडगाव, ता. दौंड जि. पुणे) याला यवत पोलिसांनी अटक केले. यास दौंड न्यायालयात हजर केले असता, त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
२९ ऑगष्ट २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सागर दत्तात्रय महाजन ( रा.सोरतापवाडी ता.हवेली जि. पुणे ) यांना दौंड तालुक्यातील मळद येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ वृंदावन हॉटेलच्या विरूद्ध बाजूस टेम्पो (नं एम. एच १२ एफ सी ७७१९) हा सोलापूर बाजूकडे घेऊन जात असताना पाठीमागून दोन मोटार सायकलवर चार अनोळखी व्यक्तींनी हाताने मारहाण करून गाडीत ठेवलेली रोख रक्कम २९ लाख ७८ हजार रुपयांची बॅग घेऊन सोलापूर बाजूकडे वेगाने निघून गेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातील मंगेश ऊर्फ मयूर भगवान चव्हाण हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. बुधवारी ( ता. १८) यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केडगाव वाखारी येथे पोलीसांचे पथत वेषांतर करून सापळा रचला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला पोलीसांनी पाठलाग करून पकडले.
ग्रामीण पाेलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, रामदास जगताप, पोलीस शिपाई मारुती बाराते यांच्या पथकानेही कामगिरी केली.
दरम्यान, या आरोपीस दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली असून याने आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. यादृष्टीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे पुढील तपास करीत आहेत .