दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील प्रलंबित कुरकुंभ मोरीच्या कामासाठी रेल्वे विभागाने उद्यापासुन शुक्रवारी ( दि १३ ) पुढे आठ दिवसांचा ‘ मेगा ब्लॉक ‘ जाहीर केला आहे. त्यानुसार ‘ ब्लॉक पुश इन ‘ करण्याचे काम सुरू होईल. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश थोरात यांनी दिली. दरम्यान, रमेश थोरात यांनी पदाधिकारी यांच्या समवेत आज गुरुवारी या कामाच्या प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
रेल्वे मार्गावर असलेल्या दौंड शहरातील कुरकुंभ मोरीच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी २०१४ रोजी झाले होते. या कामासाठी तत्कालीन अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
सध्या या मोरीचे काम पुर्णत्वाकडे असून पुढील काही महिन्यात कुरकुंभ मोरीचा प्रश्न मार्गी लागेल. याठिकाणी काम करताना वाहतूक कोंडी होऊ शकते. परंतु त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दौंड पोलिस सहकार्य करीत आहेत.
वेळ पडल्यास आवश्यक तेथे वाहतूक अन्य मार्गांवर वळवणे अथवा शक्य तेथे वाहतूक बंद करणे आदी उपाययोजना देखील करण्यात येतील. इथून पुढे होणाऱ्या कामात रेल्वे पोलिसांचे देखील स्थानिक पोलिसांना सहकार्य होईल असा मला विश्वास आहे. नागरीकांनी देखील या कामाच्या बाबत सहकार्य केले तर, हे काम ठरवलेल्या वेळेत पुर्ण होईल आणि नागरिकांना होणारा त्रास कायमचा मिटेल.अशी माहिती थोरात यांनी दिली.