दौलतराव पिसाळ
वाई : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे गावाजवळील कृ्ष्णा नदीच्या डोहात बुडून एका १५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुणे येथील विजय शिवतारेंच्या पथकाने पाणबुडीच्या साह्याने अनेक तास पाण्याखाली राहून या तरुणाचा मृतदेह तब्बल ५० तासांनी बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.
शिरगावचा वेदांत चव्हाण या १५ वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसह ओझर्डे गावाजवळील सोनेश्वर येथील कृष्णा नदीच्या डोहाजवळ आले होते. शिरगावची जत्रा असल्याने त्यांचे आईवडिल वाकळा धुण्यासाठी आले होते, त्यांच्यासोबतच ही मुलेदेखीलआली होती. त्यावेळी वेदांत त्याच्या मित्रांसह नदीत पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने क्षणार्धात दिसेनासा झाला.
वेदांत हा दिसेनासा झाल्याने त्याच्या आईने हंबरडा फोडला.
वेदांतचा बुडुन मृत्यू झाल्याची माहिती ओझर्डे गावासह शिरगाव मध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने नागरीकांचा लोंढा घटनास्थळावर दाखल झाला. या घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले, डिवायएसपी शितल खराडे जानवे, भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी तातडीने महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या पथकाशी संपर्क साधून त्यांना वेदांतचा मृतदेह शोधुन काढण्यासाठी विनंती केल्याने हे पथक दुपारी ३ वाजता दाखल झाले. या पथकाने बोटीच्या आणी पाण्यातील कॅमेरेच्या साह्याने रात्री ७ वाजे पर्यंत शोध घेतला. पण अंधार पडल्याने ही शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही मोहीम सुरु करण्यात आली. पुण्याहून आलेले विजय शिवतारे व त्यांचे सहकारीही या मोहीमेत सहभागी झाले. पाणबुडीचा वापर करून कित्येक तास पाण्याखाली राहून त्यांनी वेदांतचा मृतदेह शोधून काढला.
महाबळेश्वर ट्रॅकर्सचे प्रमुख सुनिल भाटीया (बाबा),आशीष बिरामणे, तेजस, जावेद,ऋषीकेश जाधव, अमीत कोळी, अनील लांगी, अमीत झाडे, जयवंत बिरामणे, सचिन डोईहोडे,विजय शिवतारे, गुलशन यादव या टीमचे नागरिकांनी आभार मानले आहेत.