हिंगोली : महान्यूज लाईव्ह
वरातीत नाचत बसलेल्या नवऱ्यामुलाला सोडून देऊन नवरीने दुसऱ्याच्या गळ्यात माळ घातल्याची घटना नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात घडली होती. या घटनेची चर्चा अजून सुरु असतानाच अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तळणी येथे घडली आहे. मात्र या घटनेत नवऱ्यामुलीने नाही तर, पोलिसांनी नवरी अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्याने हा विवाह रोखला आहे.
तर घडले असे की, या मुलीचे लग्न सापटगाव येथील दत्तराव जाधव यांच्या मुलाशी ठरले होते. काल ( ता. २८ ) रोजी तळणी येथे हा विवाह होणार होता. पण नेहमीप्रमाणेच झाले, वरकडची मंडळी डीजेवर वरातीत नाचण्यात दंग झाली. वधुपक्षाने अनेक विनवण्या करूनही ती ऐकेनात. अखेर वाद, प्रतिवाद आणि हाणामारीवर वेळ आली. चक्क तलवारीही निघाल्या.
अर्थातच चौकशीसाठी पोलीस आले. पोलीस चौकशीत मुलगी अल्पवयीन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हा विवाह रोखला आहे.
वरातीतला डिजे आणि त्यावरचे नाचणे असेही अंगाशी येऊ शकते.