भंडारा : महान्यूज लाईव्ह
उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळूचोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची त्याच हल्लेखोरांसोबत ओली पार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
याच व्हिडिओत एक पोलिस यापूर्वीही आपण कशी तुम्हाला ( वाळुचोरांना ) मदत केली. ही तर फार किरकोळ बाब आहे असे अभिमानाने सांगतानाही दिसतो आहे.
भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० वाळूचोरांनी हल्ला केला. त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली. या हल्लेखोरांच्या शोधासाठी पवनी पोलीसांनी सगळीकडे पथके पाठवली. त्यातील एक पथक त्याच हल्लेखोरांसोबत एका ढाब्यावर पार्टी करत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओतील पोलीस आपल्या कर्तृ्त्वाचा पाढा या वाळूचोरांसमोर वाचताना या व्हिडिओत दिसतो आहे. यामध्ये तो थेट आयजीचेच नाव घेताना दिसतो आहे.
या पोलिसाचे नाव दिलीप घावडे असे असून तो सहा महिन्यांपूर्वी तुमसरहून पवनी येथे बदलून आला आहे. त्याच्यासोबर प्रातांधिकाऱ्यांवर हल्ला करणारा आरोपी राजू मेंगरे दिसत आहे. तर कोचे, लांबट हे पोलीस कर्मचारीही सोबत मेजवानीवर ताव मारताना दिसत आहेत.
या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांवर टिकेची झोड उठली असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.