दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खोरवडी येथील बेकायदा वाळू उपसा करून त्याचा शेतजमीनीत साठा करीत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी दोघांवर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण सर्जेराव खोमणे (रा. खोरवडी ता. दौंड ) व गणेश कैलास आल्हाट (रा. दौंड ता. दौंड ) अशी या वाळू चोरांची नावे आहेत. खोरवडी परिसरात बेकायदा वाळू उत्खनन करून त्याचा साठा केला जात असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांना मिळाली. तहसीलदार यांनी मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या पथकास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार देऊळगाव राजेचे मंडलाधिकारी महेश गायकवाड, दौंड मंडलाधिकारी सुनिल जाधव, तलाठी बापू देवकाते, हरिश्चंद्र फरांदे,संतोष इडुळे तलाठी पाटस, कोतवाल अंबादास शिपकुले आदींनी माहिती मिळालेल्या ठिकाणी बुधवारी ( दि.२० ) रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यावेळी शेतजमीन गट क्रमांक १३ मध्ये बेकायदा वाळूचा साठा केला असल्याचे या पथकाचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता नारायण सर्जेराव खोमणे यांनी गणेश कैलास आल्हाट यांच्या मदतीने शेतात वाळुचा ( गौणखनिज ) बेकायदा साठा केला असल्याचे दिसले. याबाबत सखोल चौकशी केली असता समजले की, नारायण सर्जेराव खोमणे व गणेश कैलास आल्हाट हे दोघे जण जेसीबी व ट्रॅक्टरचे सहाय्याने अनाधिकृत वाळु चोरुन उपसा करुन तिचा दौंड खोरवडी शिव रस्त्यालगत अनाधिकृतपणे साठा करीत आहेत. या पथकाने २४ हजार किंमतीची सुमारे ३ ब्रास वाळू जप्त केली.
याबाबत तलाठी बापू देवकाते यांनी दौंड पोलीस स्टेशनला गौण खनिज कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली.