मुंबई : महान्यूज लाईव्ह
पाकिस्तानातील कराचीमध्ये मंगळवारी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात तीन चीनी प्राध्यापिका, व्हॅनचा ड्रायव्हर आणि आत्मघातकी हल्लेखोर महिलांचा मृत्यू झाला. या घटनेच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला दिसत आहे. तिच्या बाजूने एक व्हॅन जाताना दिसते. मग अचानक स्फोट होतो.
या बुरखाधारी महिलेची आता ओळख पटली आहे. तिचे नाव आहे शारी बलूच. कराची विद्यापीठात एम फील करणारी, दोन मुलांची आई असलेली शारी एका माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. तिचे पती डेंटिस्ट आणि लेक्चररही आहेत. तिचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. तिने झुऑलॉजीध्ये मास्टर्सची पदवी घेतलेली आहे.
अशी उच्चशिक्षित महिला आत्मघातकी हल्लेखोर कशी झाली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शारीने दुपारी १२.१० वा. तिच्या व्टिटरवरून ‘ गुडबाय ‘ असे व्टिट केले होते. तिच्या पतीनेही एका अज्ञात ठिकाणावरून व्टिट करत आपल्याला दोन मुले असल्याचे म्हणले आहे. त्यांनी या व्टिटमध्ये ‘ शारी जान, तु्झ्या या नि:स्वार्थ कृत्यामुळे मी निशब्द झालो आहे. मात्र, मला तुझा अतिशय अभिमान वाटतो आहे. ‘ असे म्हणले आहे.
शारी ही आत्मघातकी हल्लेखोर कशी झाली याचे कारण पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये मांडलेल्या छळवादात आहे. याच भागातून चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर महामार्ग जात आहे. या महामार्गाला बलूचिस्तानमधील नागरिकांचा विरोध आहे. पुर्वीपासूनच या भागातील लोकांना पाकिस्तानचे वर्चस्व नको आहे. त्यामुळे येथे बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये सतत संघर्ष सुरु असतो. बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यावर अनेकदा हल्ले चढवले आहेत. चीनच्या कॉरीडॉरमुळे लोकांचा चीनलाही विरोध आहे.
या हल्ल्यामुळे चीन आणि पाकिस्तान दोघांनाही धक्का बसला आहे. चीनचे तीन नागरिक ठार झाल्याने चीनने हे सगळे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले आहे.