मुंबई : महान्यूज लाईव्ह
१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवून पळून गेलेला दाऊद तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वचन टिकवून आहे. दाऊदशी संबंध असल्याच्या खऱ्याखोट्या दाव्यांनी आजपर्यंत अनेकांची राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे.
शरद पवार, एकनाथ खडसे, नवाब मलिक ही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेली काही नावे. आज मात्र यामध्ये आश्चर्यकारकरित्या नवनीत राणांचेही नाव सामील झाले आहे. नवनीत राणा सध्या जोरात आहेत. त्यांचे नाव सध्या देशपातळीवर गाजते आहे. मुळच्याच अभिनेत्री असल्याने रोज नवेनवे प्रयोग करून त्या आपल्यावरचा प्रसिद्धीचा झोत कसा कायम राहील याची काळजी घेत आहेत. पण आता ज्या कारणाने त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे, ती मात्र त्यांना अजिबात नको असेल.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला युसुफ लकडावाला यांच्यातील एक व्यवहार उघडकीस आणला आहे. या युसुफ लकडावालाने नवनीत राणांच्या राणा एज्युकेशन सोसायटीला ८० लाखाचे कर्ज दिले आहे. या कर्जाचा उल्लेख नवनीत राणा यांच्या निवडणूकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही आहे.
वीस वर्षापूर्वी दाऊदशी संबंध असलेल्या एका व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहे. आता नवनीत राणा यांनीही दाऊदशी संबंध असलेल्या युसुफ लकडावालाकडून आर्थिक मदत घेतल्याचे उघड होत आहे. नवाब मलिक यांच्याबाबत कठोर असलेल्या केंद्रीय यंत्रणा नवनीत राणांनाही तोच न्याय लावणार का, याकडे आता लोकांचे लक्ष लागले आहे.