मुंबई : महान्यूज लाईव्ह
किरिट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास हल्लेखोरांना जागेवरच गोळ्या घालण्याचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संचालकांनी दिले असल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. हे ‘ शुट अॅट साईट ‘ चे आदेश अत्यंत गंभीर परिस्थितीत दिले जातात. किरिट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा दिलेली असून सीआयएसएफचे जवान त्यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असतात.
किरीट सोमय्यांवर दोनदा हल्ले झाल्याने आता हल्ला झाला तर जागेवरच गोळ्या घाला असे आदेश खरोखरच दिले गेले आहेत का ही एक अफवा आहे याचीही अद्याप स्पष्टता नाही. गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना याबाबत विचारले असता असा आदेश देण्याची परवानगी कुणालाच नसते असे त्यांनी सांगितले.
शुट अॅट साईट हा आदेश फक्त लष्करापुरता मर्यादित आहे. अतीअपवादात्मक परिस्थितीत असा आदेश दिला जातो. यामुळे भाजपाच्या गोटातून अशी अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून सोडली गेली असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सीआयएसएफला पत्र लिहले आहे. किरीट सोमय्या यांच्यावर मातोश्रीजवळ हल्ला झाल्याचे जे सांगितले जाते, त्यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक कोठे होते, असा प्रश्न संजय पांडे यांनी उपस्थित केला आहे. हा गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हणले आहे. मातोश्रीजवळ आपल्यावर हल्ला झाल्याचे किरिट सोमय्या यांनी म्हणले, त्यावेळी एकही सुरक्षारक्षक त्यांच्या आसपास नव्हता. ही गंभीर गोष्ट असल्याचे संजय पांडे यांनी म्हणले आहे.