मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ल्यानंतर एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यांची अखेर 18 दिवसानंतर सुटका झाली असून सुटका झाल्यानंतर त्यांनी भारताच्या संविधानाचा विजय असल्याचे सांगत आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत देऊ असे सुनावले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची आज संध्याकाळी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आर्थररोड कारागृहात पोचले होते, परंतु कारागृह प्रशासनाने सदावर्ते यांचा ताबा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सांगत त्यांनी हा ताबा देण्यास नकार दिला. त्यामुळे सदावर्ते यांची सुटका झाली आणि ते निवासस्थानी रवाना झाले.
अर्थात त्यानंतरही सदावर्ते हे आक्रमक राहिले. त्यांनी आपण यापुढे देखील भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार असे सांगून हम हिन्दुस्तानी है असे त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार सांगितले. ते म्हणाले, भारताच्या संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.
तेरा वर्षाची माझी मुलगी आणि पत्नी जयश्री पाटील आणि माझ्या मित्रपरिवाराने अन्यायाविरोधात मला साथ दिली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या विविध भागातले हिंदुस्थानी कष्टकरी माझ्यासोबत राहिले. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू असे म्हणत जय श्रीराम, जय भिम, वंदे मातरम अशा घोषणा सदावर्ते यांनी दिल्या.