भोर : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील आंबाडे गावातील सिद्धी सचिन खोपडे ही गावाचा व घरातील पैलवानकीचा वारसा पुढे चालवत असून तिने गावाचे व तालुक्याचे नाव देशांमध्ये केले आहे.
घरातीलच कुस्तीचा वारसा असल्याने सिद्धीची कुस्तीची लहानपणापासूनच आवड लक्षात घेऊन आजोबा वसंत सोनबा खोपडे, वडील सचिन खोपडे व आई सुचिता सचिन खोपडे या गेली अनेक वर्ष मुलीच्या कुस्तीला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून उत्कृष्ट मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी झटत आहेत. या मध्ये आई सुचिता खोपडे या अपार कष्ट घेत आहेत.
पाच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सिद्धीने झारखंड रांची येथे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६९ किलो महिला वजन गटात कास्य पदक मिळवून आंबाडे गावाबरोबर भोर तालुक्याचे नाव मोठे केले आहे. सिद्धी औरंगाबाद येथील श्री स्वामी रामदास विद्यालयात ११ वी सायन्स मधून शिक्षण घेत असून सध्या ती आळंदी येथील रघुनाथ महाराज स्पोर्ट अकॅडमी मध्ये कर्नाटक येथील एनआयएस कोच सानू राली खताळी यांच्या मार्गदर्शना खाली कुस्तीचे धडे गिरवत आहे. तिच्या आई सुचिता खोपडे यांची पूर्ण भारतभर प्रवासात मार्गदर्शन व साथ मिळत असते.
याच राष्ट्रीय स्पर्धेतील यशाची दखल घेऊन ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष राजीव केळकर यांनी पाच हजार रुपये किमतीचा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सिद्धीचा सन्मान केला. या प्रसंगी आजोबा वसंत खोपडे, धंनजय खोपडे, राजीव केळकर, आई सुचिता खोपडे, विक्रम जोशी, शेखर भडाळे, राहुल खोपडे उपस्थित होते.