बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
लग्न आणि त्यापुर्वीची वरात याचे अनेक किस्से मशहूर आहेत. वरातीत नाचण्याच्या नादात लग्नाला उशीर होणे हे नेहमीचेच झाले आहे. पण बुलढाणा जिल्ह्यातील एक लग्नात या वरातीला यायला इतका उशीर झाला की, नवरीने या उशीरा आलेल्या नवरदेवाला नाकारून त्याच मांडवात दुसऱ्या मुलाच्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे ज्यांचे लग्न अजून व्हायचे आहे, त्यांनी जरा जपून. तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना वरातीत नाचण्याची हौस असेल, पण त्यामुळे तुमची होणारी बायको नाराज व्हायला नको.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे हा विवाहसोहळा २२ एप्रिलला होता. त्याची वेळ दुपारी ३.३० वा. होती. पण या लग्नात सुरुवातीपासूनच उशीर होत गेला. पाहूणे उशीरा आले. त्यामुळे लग्नापूर्वीच्या विधींना उशीर झाला. परण्या निघण्यासही उशीर झाला. त्यानंतर सुरु झाली वरात. नवरदेवाचे टाकून असलेले मित्र मैदानात उतरले आणि मग काय. ‘ आवाज वाढीव डिजे तुझ्या ‘ ला जोर चढला. लग्नमंडपात वऱ्हाडी जवळपास चार ते पाच तास खोळंबून पडले. याचा वचपा वरात आटोपून नवरदेव लग्नमंडपात पोचल्यावर निघाला.
प्रथम प्रश्नोत्तरे, नंतर बाचा आणि बाची, पण रितसर धरपकड झाली. अखेर आता हे लग्न होणे नाही यावर शिक्कामोर्तब झाले. नवरदेवाला नवऱ्यामुलीला घेतल्याशिवाय लग्न न करताच लग्नमंडप सोडावा लागला.
त्यानंतर पाहुण्यारावळ्यांना मुलीकडच्यांना दुसरा मुलगा सुचविला आणि त्याच मंडपात नवऱ्यामुलीने त्या दुसऱ्या मुलाच्या गळ्यात माळ घातली.
डिजेच्या तालावर नाचू इच्छिणाऱ्यासाठी ही कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी हीच सदिच्छा.