मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल, पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याकडे एका भारतीयाची सुसाट वेगाने वाटचाल सुरू आहे. अवघ्या २५ दिवसात गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये २३ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
आज डॉलरची किंमत ७६ रुपये आहे, हे लक्षात घेता अवघ्या २५ दिवसात गौतम अदानींनी १७४८ अब्ज रुपये कमावले आहेत. २ एप्रिल रोजी गौतम अदानींची संपत्ती १०० अब्ज डॉलर होती, आणि ते जगात दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. आज २६ एप्रिल रोजी ते १२३.७ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये पाचव्या क्रमांकावर पोचले आहे.
जागतिक गुंतवणूकदार वॉरन बफे ( संपत्ती १२१.७ अब्ज डॉलर ) यांना मागे टाकून ते पाचव्या स्थानावर पोचले आहेत. भारतामधील त्यांचे स्पर्धक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांच्यांकडे १९ अब्ज डॉलर जास्त संपत्ती आहे. आता जगात त्यांच्यापेक्षा श्रीमंत असलेल्या फक्त चार व्यक्ती आहेत.
पहिल्या क्रमांकावर एलन मस्क ( २६९ अब्ज डॉलर ), अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेरोझ ( १७०.२ अब्ज डॉलर ), फ्रेंच उद्योगपती बेरेंड अरॉन्ट ( १६७. ९ अब्ज डॉलर ) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस ( १३०.२ अब्ज डॉलर ) हे ते चार जण आहेत.
एक भारतीय जगातील सर्वाधिक श्रीमंत झाला तर प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटणार आहे, पण त्याच भारतात रोजची भूकही भागवू न शकणारे करोडो लोक आहेत, याचेही भान यासोबत ठेवावे लागणार आहे.