औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या राजकारणात भोंग्याच्या आवाजाने वरची पट्टी गाठली आहे. या वातावरणाचा परिणाम धार्मिक विद्वेष वाढविण्यात कसा होऊ शकतो, हे दाखवून देणारी एक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. नमाजपठण सुरु असतानाच्या काळात मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लाऊन गाणे वाजवून चिथावणी दिल्याच्या आरोपावरून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
किशोर मलकुनाईक असे या व्यक्तीचे नाव असून ते परळी वैजनाथ येथे रेल्वे सुरक्षा दलात सेवा देतात. त्यांचे घर औरंगाबादेतील अमृत साई प्लाझा येथे आहे. त्यांनी त्यांच्या राहत्या घरामागे असलेल्या मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लावला. नमाज पठण करण्याच्या वेळी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजविले.
रेल्वे सुरक्षा बलासारख्या जबाबदार पदावर असतानाही शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले. दोन धर्म, निरनिराळ्या गटात शत्रुत्व वाढेल व एकोप्याला बाधा होईल व तेढ निर्माण होईल याची जाणीव असतानाही हे कृत्य करून चिथावणी देल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
भारतीय दंड विधान कलम ५०५ ( १ ) ( ब ) आणि ५०५ ( १ ) ( क ) तसेच पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार किशोर मलकुनाईक यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राज ठाकरेनी ३ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील हे प्रकरण येथेच न थांबण्याची चिन्हे आहेत.