डॉ. महेश घोळवे
महान्युज लाइव्ह विशेष
” लहान मुले म्हणजे देवाघरची फुले ” अशी म्हण आहे. म्हणजेच फुलांचे नाजूकत्व मुलांमध्ये असते. सध्याचा तीव्र उन्हाळा आणि विक्रमी तापमान याचा विपरीत परिणाम सध्या लहान मुलांवर दिसून येत आहे. उलट्या-जुलाब, त्वचेवर पुरळ, त्वचाविकार तसेच डीहायड्रेशन हे वारंवार दिसून येत आहेत. या कसोटीच्या काळात लहान मुलांची तीव्र उष्णतेपासून काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. चला तर पाहुयात कशा पद्धतीने काळजी आपण घेऊ शकतो.
सध्याचा तीव्र सुर्यप्रकाश टाळण्यासाठी बाळाला सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाहेर घेऊन जाऊ नका. सुर्यास्तानंतर तुम्ही बाळाला फिरायला नक्कीच घेऊन जाऊ शकता. कारण उन्हाळ्यामध्ये देखील तुमच्या बाळाला खेळण्याची तितकीच गरज असते.ज्यामुळे तुमच्या बाळाची पचनक्रिया योग्य रहाते व भूक देखील चांगली लागते.
उकाड्यामध्ये तेल मालिश केल्याने त्वचेवरील तेलामुळे फायद्यांपेक्षा नुकसान अधिक होतो. कारण जर हे तेल व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर ते त्वचेच्या दुमडलेल्या भागात तसेच साचून रहाते. ज्यामुळे बाळाला उष्णतेचे पुरळ, खाज, गळू अशा त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. हे तेल नॅपीच्या भागात, गळ्याच्या मागच्या भागात, पाठ व खांद्यावर तसेच रहाते. यासाठी तुम्ही बाळाचे हे भाग चांगले स्वच्छ केले पाहिजेत. तसेच पावडरचा अतिवापर टाळा. कारण घामामुळे ती पावडर ओली होते व त्वचा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
तापमानाचा पारा जसा चढत जातो तसा डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर त्याला वेळेवर दूध दिल्याने बाळ हायड्रेड राहण्यास मदत होईल. पण जर तुम्ही बाळाला बाहेरचे अन्न देत असाल तर लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये तुमच्या बाळाची भूक कमी होत असते. यासाठी त्याला फळांचा रस,ताक असे द्रवपदार्थ द्या. हे पदार्थ भरविण्यापूर्वी ग्लास काही मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा पण ते फार थंड होणार नाही याची काळजी घ्या. लहान बालकांना कोल्ड्रिंक्स कधीही देऊ नयेत.
दारे खिडक्या बंद असतील तर उन्हात वातावरण अधिक कोंदट व दमट होते. त्यामुळे नेहमी खिडक्या उघड्या ठेऊन घरातील वातावरण हवेशीर राहील याची काळजी घ्या.