सुरेश मिसाळ
इंदापूर: महान्यूज लाईव्ह
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात काल शनिवारी झालेल्या महाआरोग्य मेळाव्यात दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ पाच रुग्णांची तपासणी, एक जणाचे रक्तदान झाले होते. तर या मेळाव्याच्या सभा मंडपात रुग्णांपेक्षा आरोग्य कर्मचारी जास्त तसेच उपस्थितांसाठी आणलेल्या खुर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिकाम्या खुर्च्या दिसून आल्याने महाआरोग्य मेळाव्यास अल्प प्रतिसाद दिसून आल्याचे चित्र आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्व रोगांची मोफत तपासणी होणार होती.या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा या साठी दहा दिवसांपूर्वीच मेळाव्याचे अनुदान एक लाख रुपयांवरून वाढवून दोन लाख करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाआरोग्य शिबिर होत असल्याचे सूचित करण्यात आले होते.
इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी नऊ ते दोन या वेळेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ पाच रुग्णांची तपासणी, एक जणाचे रक्तदान झाले होते. सभा मंडपात रुग्णांपेक्षा आरोग्य कर्मचा-यांचीच गर्दी व रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. या महाआरोग्य मेळाव्याबाबतची माहिती दुपारी चार नंतर देण्यात येईल,असे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष खामकर यांनी पत्रकारांना सांगितले.
डॉ.खामकर यांना दहा दिवसांचा कालावधी मिळाला असताना देखील गुरुवारी या कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना मिळाली. या खेरीज हा कार्यक्रम सर्वाना माहिती व्हावा, अशी कुठलीही हालचाल संबंधित विभागाकडून झाली नाही.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामासाठी करोडो रुपयांच्या निधीचा महापूर आणला आहे. भरणे निधी आणण्यात अथवा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यात कोठे ही कमी पडत नाहीत. गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी ते अष्टोप्रहर प्रयत्न करत असतात. गोरगरिबांवर पुणे, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होण्यासाठी पुणे-मुंबई येथे त्यांनी स्वतंत्र यंत्रणा मदत करण्यासाठी उभी केली आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीबांना उपचार घेणे परवडत नसल्याने तालुका स्तरावर होत असलेल्या विविध रोगांवरील महाआरोग्य शिबिरामुळे गोरगरिबांना मदत झाली असती. मात्र उपजिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्णांना या मेळाव्याचा अपेक्षित लाभ घेता आला नाही. अशावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी चौकशी करावी व त्यांना योग्य स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.