मुंबई : महान्यूज लाईव्ह
देशाचे राष्ट्रगीत हा देशातील नागरिकांच्या अभिमानाचा विषय असतो. देशाचे सरकारही राष्ट्रगीताचे पावित्र्य काटेकोरपणे जपण्याचे काम करत असते. पण आपला शेजारी चीन मात्र त्यांच्या राष्ट्रगीतामधील एका ओळीमुळे सध्या इतका हैराण झाला आहे की राष्ट्रगीतातील ही ओळ म्हणल्याबद्दल तसेच कुठे लिहल्याबद्दल शेकडो जणांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या कठोर लॉकडाऊन आहे. लोकांची आपापली घरेच आता तुरुंग बनली आहेत. त्यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाही. यामुळे आता नागरिकही वैतागले आहेत. त्यांनी सरकारच्या या धोरणाचा विरोध सुरु केला आहे. चीनी राष्ट्रगीत ‘ मार्च ऑफ द व्हॉलंटियर्स ‘ मधील एक ओळ ते सरकारच्या विरोधात वापरत आहेत. ‘ जागे व्हा, ज्यांना गुलाम व्हायचे नाही. ‘ अशा अर्थाची ही ओळ म्हणून किंवा आसपासच्या भिंतींवरून लिहून चीनी नागरिक आपला असंतोष व्यक्त करीत आहे.
चीनी सरकारला थोडाही विरोध सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रगीताची ही ओळ लिहणाऱ्या किंवा म्हणणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. अनेकांना या कारणासाठी तुरुंगात टाकले जात आहे.
आपल्याच राष्ट्रगीतामधील ओळींमुळे सरकार हैराण झाले असल्याची ही अजब घटना आहे.