दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील कडेगाव या गावातील ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेदिवशी झेंडा बैल गाड्याचे चाक एकाच्या छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आणि यात्रेवर शोककळा पसरली. ( wai, Satara : On the day of Yatra of village goddess JanaiDevi in Kadegaon village of the taluka, the wheel of the flag bullock cart passed over the chest of the youth and he died on the spot and mourning spread on the Yatra
या घटनेत सागर माधवराव मुरुमकर यांचा मृत्यू झाला. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच यात्रा होत असल्याने गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण असतानाच काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वाई तालुक्यातील कडेगाव या गावाचे ग्रामदैवत जानुबाई देवीची वार्षिक यात्रा २३ व २४ एप्रिल रोजी भरविण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते. पारंपारिक पध्दतीने यात्रेचा मुख्य दिवस शनिवार दि. २३ एप्रिल हा होता. या दिवशी रुढी परंपरेने देवीच्या मंदिरात तयार केलेला गाडा असतो. या गाड्याला दगडी चाके असतात. हा गाडा फिरवला जातो.
या दगडी चाकांवर मोठे लाकूड असते. त्यावर ऊंच असा खांब बसवलेला असतो. त्यावर मोठा झेंडा लावलेला असतो. अशा पध्दतीने तयार केलेल्या या गाड्यावर अंदाजे २५ ते ३० भाविक ग्रामस्थ बसलेले असतात. हा बलाढ्य गाडा बैलांच्या साह्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघुन तो गावाच्या शिवेपर्यत नेण्यात येत असतो. अशी येथील परंपरा आहे.
काल नेहमीप्रमाणे शिवेपासुन पुन्हा गावाकडे हा गाडा परतत असताना तो रस्ता सोडून शेतात घालण्यात आला. त्या वेळी हा गाडा थोरवे यांच्या शेतात अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी बैलांनी हिसका दिला. त्यामुळे गाडा एका बाजूला कलंडला. गाड्याच्या वर बसलेले सागर माधवराव मुरुमकर हे खाली कोसळले. गाड्याभोवती नागरिकांची गर्दी खुपच असल्याने काही समजण्याआधीच त्यांच्या छातीवरुन दगडी चाक गेल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती कडेगावचे पोलिस पाटील अक्षय टिके यांनी तातडीने वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना कळविली. भरणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ हवलदार शिवाजी वायदंडे, रामदास पवार, एच.एस.शिंदे, गहीत यांना तातडीने घटनास्थळावर पाठवले. सागर माधवराव मुरुमकर (वय ३८) यांना गावकऱ्यांनी वाईच्या खाजगी रुग्णालयात आणले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत .